Janmarathi

वादळामुळे कोसळलेल्या ८१२ झाडांपैकी ७० टक्के झाडे विदेशी

It was found that the cyclone uprooted many trees in Mumbai. 70 per cent of all such trees are foreign species.

वादळामुळे कोसळलेल्या ८१२ झाडांपैकी ७० टक्के झाडे विदेशी
X

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई परिसरात विविध ठिकाणच्या खासगी जागेतील ५०४, तर सार्वजनिक जागेतील ३०८ अशा ८१२ झाडांची पडझड झाली आहे. तसेच, या ८१२ झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातीची असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबईत तौत्के चक्रीवादळाचा १६ आणि १७ मे रोजी मोठा प्रभाव दिसून आला होता. मुंबई शहर व उपनगरात ११४ किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शहर व उपनगरात विविध प्रकारची ८१२ झाडे मंत्रालय, भायखळा, सेनाभवन आदी ठिकाणी पडली. यापैकी ५०४ झाडे ही खासगी जागेतील, तर ३०८ झाडे ही सार्वजनिक जागेतील आहेत.

चक्रीवादळामुळे झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तथापि, महापालिकेच्या उद्यान विभागाने दिवसरात्र मेहनत घेत विविध पद्धतीने नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केल्याचा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे.

वादळामुळे कोसळलेल्या ८१२ झाडांपैकी ७० टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची असून यामध्ये प्रामुख्याने सोनचाफा, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ही बाब पालिकेने अतिशय गंभीरपणे नमूद केली आहे.

यापुढे मुंबईत विशेषतः महापालिका क्षेत्रात वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेण्यात येईल व त्यावर आवश्यक ती कृती करण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

तीन दिवसांच्या कालावधीत पडलेल्या ८१२ पैकी २४९ झाडे ही शहर भागातील, तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही १६ व १७ मे २०२१ रोजी पडली. तर २६७ झाडे ही १८ मे रोजी पडली.

मुंबईत ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे १ हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यापैकी ७९८ फांद्या या खासगी जागेतील असून उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक जागेतील आहेत.

नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची कार्यवाही देखील नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story