Janmarathi

मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार; रुग्णालयाची बदमाशी

It was found in Nanded that the hospital was treating a corona patient even after death of the patient

मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार; रुग्णालयाची बदमाशी
X

नांदेड: कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू होऊन 3 दिवस ऊलटले तरी उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले.

त्यावरून गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचा-यांविरोधात फसवणुकीची कलम 420 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

अंकलेश पवार यांना कोरोनाची लक्षणे असल्याने 16 एप्रिल रोजी गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल करताना 50 हजार रूपये फी अदा केली होती. त्यानंतर 20 एप्रिल रोजी तब्येत खालावल्याने अंकलेश पवार यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

21 एप्रिल रोजी रुग्णाच्या पत्नीकडून रुग्णालयाने आणखी फीची मागणी केली. तेव्हा रुग्णाची पत्नी शुभांगी यांनी 2 दिवसांचा वेळ मागितला. 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शुभांगी पवार यांनी 50 हजार रुपये ऑनलाईन आणि 40 हजार रुपये रोख भरले. त्यांनतर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

शोकाकूल परिवाराने अंकलेश पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, 25 एप्रिल रोजी रुग्णालयाने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र पाहिले असता त्यावर 21 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता कोविड मुळे मृत्यू झाल्याचे आढळले.

21 एप्रिल रोजी मृत्यू झाला असताना उपचार सुरु असल्याचे सांगून 3 दिवस रुग्णालयाकडून पैसे घेण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर शुभांगी यांनी रुग्णालयाकडे संपर्क साधून ओरिजनल कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्यांना आणखी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा शुभांगी पवार यांचा आरोप आहे.

रुग्णालयाकडून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत शुभांगी पवार यांनी नांदेडच्या न्यायालयाकडे दाद मागितली. न्यायालयाने सर्व युक्तिवाद एकूण प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story