Unseasonal Rain: अवकाळी पाऊस म्हणजे काय...........?

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस म्हणजे काय?
अवकाळी पाऊस हा शब्दप्रयोग गेल्या काही वर्षात जरा जास्तच प्रचलित झाला आहे. हा शब्दप्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या किवां पुस्तकीय शब्दानुसार योग्य नाही. जेव्हा आपण मान्सूनच्या पावसाची आकडेवारी काढतो आणि काही संशोधन करतो, तेव्हा आपण आपल्या सोयीसाठी पावसाचा वर्षभराचा कालावधी हा १ जून ते ३० सप्टेंबर निवडला आहे. त्यामुळे संपूर्ण पाऊस या कालावधीतच पडतो, अशी आपली एक गैर समजूत झालेली आहे. मान्सूनचा ७० ते ८० टक्के पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये या कालावधीत पडतो आणि उर्वरित २५ ते २० % पाऊस हा उन्हाळा आणि हिवाळ्यात पडतो.
भारतीय द्वीपकल्प हा दोन बाजूनी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. सर्वाधिक महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे जोरात वाहत असतात. या वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा एक सारखी नसते, तर या वाऱ्यांची दिशा हि वेगवेगळी असते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्पचे प्रमाण असते आणि हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि भूपृष्ठ भाग अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मार्च आणि एप्रिल मध्ये पाऊस पडताना दिसतो.
मेघगर्जना हा निम्न पातळीवर तयार होणारा ढग असला तरी त्याचा वरचा भाग उच्च पातळीपर्यंत वर गेलेला असतो. अनेक ढग एकावर एक रचून पर्वतासारखा उंच वाढणारा, वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसणारा, तर तळभागात अनेक वर्षास्तरी मेघखंड असणारा हा ढग अस्थिर हवेचा निदर्शक मानला जातो. ढगाच्या तळभागात जलबिंदू असतात तर वरच्या भागात हिमकण असतात. हे ढग घनदाट असल्यामुळे खालून पाहताना काळे दिसतात. हे ढग एकएकटे किंवा एका पाठोपाठ एक असू शकतात. या ढगांच्या वरच्या भागात हिमकण असल्यामुळे काही भागात गारांचा पाऊस पडतो. ह्या ढगांपासून विजा पडून गडगडाटासह जोरदार हिमवृष्टी होऊ शकते. बऱ्याचदा ह्या ढगांबरोबर दिशाहीन जोरदार वादळवारेही वहात असतात. असे वारे व जोरदार वृष्टी ही काही वेळा विनाशकारी ठरू शकते. मात्र हे ढग फार काळ टिकत नाहीत. होणारी वृष्टी आणि जोरदार वाहणारे वादळ वारे ह्यामुळे आसपासची हवा थंड होऊन आर्द्र हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह दुबळे होतात आणि थोड्या वेळातच ढग नाहीसे होतात. मान्सूनपूर्व म्हणजे पावसाळ्याच्या आधी पडणारा वळीवाचा पाऊस किंवा गारा ह्याच प्रकारच्या ढगातून पडतो. पावसाळ्याच्या शेवटीशेवटी होणारा हस्त नक्षत्रातील पाऊस हा याच प्रकारच्या ढगांतून पडतो.
क्युमिलो निंबस’ ढग कसा तयार होतो......?
थंड वारे आणि उष्ण वारे एकमेकांन मध्ये मिसळल्यामुळे हे ढग तयार होतात. उदाहरणार्थ, डोंगरामुळे हवेचा प्रवाह हा ऊर्ध्वमुखी होतो. हवा वर जाते आणि उंचावर जाऊन त्या हवेतील बाष्पांचे ढग निर्माण होतात. भारतात सर्वाधिक फेब्रुवारी-मार्चमध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारचा पाऊस सातत्यानं जास्त प्रमाणात पडताना दिसून आलेला आहे. महाराष्ट्रात २०१४-१५ मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटदेखील झाली होती. त्यामुळे हा पाऊस अनपेक्षित नसून या घटना घडत असतात. पूर्वी या पावसाचं पूर्वानुमान काढणं शक्य नव्हतं. आता या अवकाळी पावसाचं पूर्वानुमान काढणं शक्य असल्यानं पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार आणि त्यावर सातत्यानं काम व्हायला पाहिजे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’........
नावाप्रमाणेच वातावरणातील हा प्रक्षोभ पश्चिम दिशे कडून महाराष्ट्रात येतो. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि या अगोदरच महाराष्ट्रात दमट आणि उष्ण हवा असते. महाराष्ट्राच्या उत्तरे कडील भागात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ वाहत असतात आणि दक्षिणेकडे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ असते. हे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ आणि ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ एकमेकांत मिसळल्यानं अवकाळी पाऊस पडण्यास अनुकूल वातवरण निर्माण होते. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ साधारण फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरवातीस येतात.
‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ म्हणजे काय......?
वारे वाहण्याची दिशा कशी ठरवतात, हे पाहणंही तेवढच रोचक आहे. वारे कसेही आणि कोणत्याही दिशेला वाहत नाही. हवा हि गोलाकार फिरत वर जाते. ही हवा वर जात असताना तिच्या मार्गातील सगळं बाष्प एकत्र करत-करत पुढे सरकते. याउलट ‘अँटी क्लॉकवाइज सर्क्युलेशन’ असते. इथं बाष्प केंद्रित होण्याऐवजी पसरतं. एखादी गोष्ट पसरल्यानं त्याचा प्रभाव कमी होतो, तर ती एकत्रित आल्यानं त्याचा प्रभाव वाढतो. ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ एक प्रकारे हवामान नियंत्रित करण्याचं काम करतं. यामुळे हवा एकाच जागी न राहता, ती फिरत राहते. त्यामुळे वारे, बाष्प, पाऊस इकडून तिकडे जाते आणि त्यामुळे बिगरमोसमी पाऊस पडतो.