अतिचिंतेवर ताबा मिळवण्यासाठी उपाय.
मानसिक स्वास्थ्य मिळवण्याचे साधे मार्ग

मानसिक स्वास्थ्य हा ज्वलंत विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येत शारिरीक आरोग्याच्या बरोबरीने मानसिक आरोग्याला महत्त्व दिले आहे. मनुष्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी, आयुष्याचा आस्वाद घेण्यासाठी हे स्वास्थ्य आवश्यक आहे.
चिंता किंवा एंग्झायटी हा शब्द आज बर्याच लोकांकडून आपण ऐकतो. `एंग्झायटी' म्हणजे नेमक काय? तर चिंतेचा मानसिक व शारीरिक अनुभव म्हणजे एंग्झायटी होय. काही वेळा चिंता वाढली तर काही लोकांना डोकेदुखी, अंगदुखी, अपचन, एकाग्रता कमी होते इ. प्रकारचा त्रास होतो. यामुळे रोजचे आयुष्य जगणे असहज बनते तर काही वेळा अडचणीत येते. एखाद्या परिस्थिती किंवा घटनेचा आपण नकारात्मक विचार करून चिंता ओढवून घेत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे तनाव निर्माण होतात व ही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आपण अगदी साध्या मार्गाने चिंतेवर ताबा मिळवू शकतो.
- योग्य व संतुलित आहार, वेळेवर घेतलेली झोप याने आपल्या शरीराला आवश्यक पोषण व झीज भरून काढण्यासाठी वेळ मिळतो त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती कितीही कठीण असेल तरीही आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
- व्यायामाची गरज स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना असते. रक्तप्रवाह व रक्तदाब याचे संतुलन राहिले तर मेंदूवर अतिरिक्त तनाव येत नाही.
- मित्र, परिवार यांच्यासोबत वेळ घालवा, संवाद साधा त्यामुळे बराच तनाव दूर होतो, काही वेळा अडचणीवर मार्ग देखील मिळतो. अशी 'सपोर्ट सिस्टम' सर्वांकडे असणे आवश्यक आहे.
- कामातून किमान आठवड्यात एकदा किंवा महिन्यातून एकदा सुट्टी घेऊन काही वेळ नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी करण्यात घालवला तर चिंतेचे विचार दूर होतात.
- कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. यासाठी ध्यान, साधना सारख्या गोष्टी मानसिक समस्यांवर उपाय करत असताना मोठी मदत करतात.
- भिती किंवा चिंता निर्माण करण्यास कारण असलेल्या गोष्टीवर नेहमीसाठीचा उपाय काढण्याचा प्रयत्न करा.
- कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या सोडविण्यासाठी समुपदेशनाचा मार्ग कधीही उचित ठरतो.
चिंता करणे हा आजार नाही चिंतामुक्त आयुष्य जगणे शक्य आहे. आपण केवळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे गरजेचे असते. सर्व प्रश्नांची व अडचणीची उत्तरे मिळवता येतात त्यासाठी संयम व स्वास्थ्य यांची कमतरता पडणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे एवढेच.