Janmarathi

लडाखचे पर्यावरण प्राधान्याने जपायला हवे : सीमान्तिनी नूलकर

Adv. Simantini Noolkar in an online meeting mentioned that we all are required to protect environment of Ladakh region.

लडाखचे पर्यावरण प्राधान्याने जपायला हवे : सीमान्तिनी नूलकर
X

कुठल्याही संस्कृतीवर त्या त्या भागातल्या आणि त्या काळातल्या भौगोलिक परिस्थितीचा पर्यावरणाचा आणि तिथं घडणाऱ्या हवामान बदलाचा मोठा परिणाम होत असतो. लडाखमध्ये संपूर्ण भारतापेक्षा वेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. हवामानही वेगळे आहे म्हणूनच लडाखचा इतिहासही वेगळा आहे. निसर्ग वेगळा आहे. हा निसर्ग आणि पर्यावरण जपणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन "रानवाटा' संस्थेच्या अध्यक्ष आणि लडाख परिसराच्या अभ्यासक ऍड. सीमान्तिनी नूलकर यांनी केले आहे.

निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात काम करत असलेल्या, डॉ. वा. द. वर्तक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेच्या "मिशन देवराई' संकल्पने अंतर्गत दर महिन्याला निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचे स्लाइड शोज किंवा व्याख्यानं आयोजित केली जातात. या उपक्रमाअंतर्गत यावर्षी "निसर्गविषयक पुस्तकांचा परिचय' या ऑनलाईन व्याख्यानमालेत नूलकर यांचे "लदाख भारताचा अद्भुत मुकुटमणी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नूलकर बोलत होत्या. प्रिया सुनील भिडे यांनी सुरुवातीला नूलकर यांचा परिचय करून दिला.

नूलकर पुढे म्हणाल्या की, लडाखमध्ये वेगळ्याच प्रकारची जैवविविधता आढळून येते. अति उंचीवरचे शीत रण, अती उंचीवरची शेतं, अति थंड प्रदेश, अति उंचीवरचे दलदलीचे प्रदेश, स्थलांतरित पक्ष्यांची प्रजनन भूमी आणि स्थलांतरादरम्यानचा मुक्कामाचा महत्त्वाचा टप्पा अशी लडाखची अनेक वैशिष्ट्ये आहेत. लदाखमधले पुष्पसौंदर्य, तिथले हिम बिबळ्या, मरमॉट, चिरु यासारखे प्राणी, जुनिपर, भूर्ज वृक्ष या सारखे वनस्पती विश्व आणि सूक्ष्म जीवविश्व अनोखं आहे. लदाखमधील लोकसंस्कृती तिथल्या याक घोडे पश्‍मिना मेंढ्या अशा प्राण्यां भोवती आणि लडाखमध्ये फुलणाऱ्या अनेक फुलांभोवती गुंफलेली आहे.

लडाखचा निसर्ग आणि तिथल्या लोकसंस्कृतीचा परिचय नूलकर यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून करून दिला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे, माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे, लदाखवर ही परिणाम झालेला आहे. इथली ग्लेशियर्स मागे हटली आहेत. हिमवर्षाव कमी झालेला आहे. निसर्गाचेही मूलभूत हक्क असतात. आपले अस्तित्व राखण्याचा आणि निसर्गचक्र अबाधित राखण्याचा हक्क निसर्गाला आहे. त्यावर माणसांनी अतिक्रमण केलेले आहे. त्या अर्थाने निसर्ग ही "इनजुअर्ड पार्टी' आहे. त्यामुळे निसर्गाला न्याय मिळवून देणं, निसर्गासाठी वकिली करणं गरजेचं आहे. निसर्गाविषयी आत्मियता निर्माण व्हावी, जवळीक निर्माण व्हावी, विध्वंसाची प्रवृत्ती कमी व्हावी हा "मिशन देवराई' या संस्थेचा आणि सीमंतीनी नूलकर याचा उद्देश या व्याख्यानामुळे सफल झाल्याची भावना सहभागींनी व्यक्त केली.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story