कधी अंगावर 'गोमांस' फेकतात, तर कधी कपाळावर अष्टगंध का लावला म्हणून मारहाण...!

कधी अंगावर 'गोमांस' फेकतात, तर कधी कपाळावर अष्टगंध का लावला म्हणून मारहाण...!
ब्रिटीश शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना धर्मामुळे सतत त्रास दिला जात असल्याची घटना समोर आली आहे. हिंदू विद्यार्थ्यांवरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. हेन्री जॅक्सन सोसायटीने केलेल्या या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, ब्रिटीश शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांचा सतत छळ होत आहे. त्यांना त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी धर्म बदलण्यास सांगितले जात आहे.
अहवालात काय आहे...........?
या अहवालात सर्वेक्षण केलेल्यांपैकी ५१ टक्के हिंदू पालकांनी कबूल केले की त्यांच्या मुलांना शाळांमध्ये हिंदुद्वेषाचा सामना करावा लागला आहे. सर्वेक्षण केलेल्या शाळांपैकी एक टक्क्यांहून कमी शाळांमध्ये गेल्या पाच वर्षांत हिंदूविरोधी घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांविरुद्ध हिंदुद्वेषाच्या घटना चिंताजनक असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या एका कुटुंबातील सदस्याने सांगितले की, त्यांच्या मुलीला शाळेत हिंदूविरोधी शिव्या दिल्या जात होत्या. हिंदू असल्याच्या कारणावरून त्यांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले आणि वर्गात तिच्यावर गोमांस फेकण्यात आले. कपाळावर टिळक असल्यामुळे माझ्या मुलीचा शाळेत इतका छळ झाला की आता ती शाळेत जायला घाबरत आहे. असे कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितले.
हिंदू विद्यार्थ्यांना 'पाकी' म्हणतात.......
ब्रिटनच्या शाळांमध्ये केवळ हिंदूविरोधी घोषणाच नाही, तर हिंदू विद्यार्थ्यांनाही वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो. हिंदू विद्यार्थ्यांवर जातीयवादी टिप्पणी केली जाते. गोरे विद्यार्थी हिंदू मुलांना 'पाकी' म्हणतात. गोरे विद्यार्थी हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एकत्र येतात आणि त्यांचा छळ करतात. ते हिंदू विद्यार्थ्यांशी बोलतही नाहीत. भारतात पंतप्रधान मोदींच्या विजयानंतर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांना अगदी 'काफिर' संबोधले जात आहे आणि धर्मांतर करण्यास किंवा नरकात जाण्यास सांगितले जात आहे.
अहवालानुसार, यूकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांनाही झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर करण्यास भाग पडले जात आहे. हिंदू विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही या अहवालातून कळले आहे. त्यांना त्यांच्या धर्माच्या द्वेषाचा सामना करावा लागतो. अशा भेदभावाच्या घटना समोर येत असल्या तरी या घटनांची योग्य नोंद होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणात सहभागी कुटुंबातील १९ टक्के सदस्यांचा असा विश्वास आहे की, शाळा हिंदूविरोधी द्वेषाच्या घटना शोधण्यात सक्षम नाहीत.
हा अहवाल रिसर्च फेलो शार्लोट लिटलवुड, शिक्षण विशेषज्ञ डॉ ऋषी हांडा आणि बॅरोनेस वर्मा यांनी तयार केला आहे. या अहवालात ब्रिटनच्या शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांसोबत सुरू असलेला भेदभाव उघड झाला आहे.