Janmarathi

देशाची पंतप्रधान थेट सायकलवरुन ऑफिसला?

The Prime Minister of Estonia Kaya Kallas goes to her office using bicycle

देशाची पंतप्रधान थेट सायकलवरुन ऑफिसला?
X

एखाद्या देशाचं पंतप्रधान हे पद म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक गाड्यांचा ताफा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि आजूबाजूला लोकांचा गराडा असंच चित्र राहतं. मात्र, एका देशाची पंतप्रधान थेट सायकलवरुन पंतप्रधान कार्यालयात जाते असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसेल? हो, पण हे खरंच आहे.

उत्तर युरोपमधील एस्टोनिया देशाच्या पंतप्रधान दररोज सायकलवरुनच आपल्या कार्यालयात जातात. काया कलास असं या महिला पंतप्रधानांचं नाव आहे. त्या एस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. एस्टोनिया हा युरोपियन संघातील एक देश आहे.

काया कलास 2018 मध्ये एस्टोनियातील रिफॉर्म पार्टीच्या नेत्या झाल्या. त्याआधी त्यांनी 2011-2014 आणि पुन्हा 2019 पासून आजपर्यंत एस्टोनियाच्या वरिष्ठ सभागृह मानल्या जाणाऱ्या रिइगिकोगुच्या सदस्य (खासदार) राहिल्या. या शिवाय 2014 ते 2018 पर्यंत त्या युरोपियन संघाच्या संसदेच्या सदस्य राहिल्या. येथे त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं.

काया कलास या युरोप आणि एस्टोनियातील कायद्यांचा अभ्यास असणाऱ्या वकील आहेत. सुरुवातीला त्यांनी वकिलीच्या क्षेत्रातच काम केलं. मात्र, 2010 मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एस्टोनियाच्या रिफॉर्म पार्टीत प्रवेश केला. नंतर एस्टोनियाच्या संसदेपासून तर युरोपियन संघाच्या संसदेपर्यंत निवडणूक लढवत त्यांनी यशस्वी वाटचाल केली. या काळात त्यांनी आपल्या नेतृत्वातील गुण सिद्ध केले.

13 डिसेंबर 2017 रोजी रिफॉर्म पार्टीचे प्रमुख नेते हानो पेवकूर यांनी जानेवारी 2018 पासून पक्षाच्या प्रमुखपदावरुन संन्यासाची घोषणा केली. यावेळी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वासाठी काया कलास यांचं नाव सुचवलं आणि काया यांना थेट राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाची संधी मिळाली. त्या एस्टोनियातील राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या.

3 मार्च 2019 रोजी काया कलास यांच्या नेतृत्वातील रिफॉर्म पक्षाने एस्टोनियाची निवडणूक जिंकली. त्यांच्या पक्षाला सर्वाधिक 29 टक्के मतं मिळाली. मात्र, 23 टक्के मतं मिळवलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या एस्टोनियन सेंटर पार्टीने उजव्या आणि परंपरावादी पक्षांसोबत एकत्र येऊन आघाडीचं सरकार स्थापन केलं.

25 जानेवारी 2021 रोजी घोटाळ्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर एस्टोनियन सेंटर पार्टीचे पंतप्रधान जुरी रतास यांनी राजीनामा दिला. यानंतर काया कलास यांनी राजकीय हुशारी दाखवत तात्काळ एस्टोनियन सेंटर पार्टीशी आघाडी करत सरकार स्थापन केलं. यासह त्या एस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.

काया कलास यांनी वकिलीपासून पंतप्रधान पदापर्यंत संघर्ष करत प्रवास केलेला असला तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील तितकीच मोठी आहे. काया एस्टोनियाचे 14 वे पंतप्रधान सिम कलास यांच्या कन्या आहेत. कायाचे आजोबा एडवर्ड अल्वर एस्टोनियाच्या संस्थापकांपैकी एक होते. ते एस्टोनियाच्या पोलीस दलाचे पहिले प्रमुखही राहिले.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story